निकड.. नव्या दमाच्या सत्यशोधकाची!
Nov 23, 2014
बाबा आढाव
महात्मा जोतिराव फुले यांच्या शतकोत्तर रौप्य
स्मृतिवर्षांरंभानिमित्त त्यांच्या वैचारिक आणि कृतीप्रधान
वारशाची आज नेमकी काय स्थिती आहे, यावर क्ष-किरण
टाकणारा लेख..
२८नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा जोतिराव फुल्यांचे निधन झाले.
पुढील वर्षी या घटनेला १२५ वर्षे पूर्ण होतील. यानिमित्ताने
अनेक कार्यक्रम होतील. महाराष्ट्राच्या खेडोपाडय़ांत
महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ पोहोचली.. पसरली.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात या चळवळीचा प्रवेश झाला.
त्यातून समाजात प्रचलित ब्राह्मण्यावर, जातिव्यवस्थेवर, स्त्री-
पुरुष भेदाभेदावर, अस्पृश्यतेवर हल्ले झाले. तत्कालीन राजकीय
स्वातंत्र्याच्या चळवळीला मूलभूत मानवी स्वातंत्र्याचा आयाम
मिळाला. १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली. फुल्यांनी मात्र
या घटनेचे स्वागत केले नाही. उलट, जाहीर शंका उपस्थित केली.
सामाजिक
गुलामगिरीचा प्रश्न मांडला. २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक
समाजाची स्थापना झाली. ७३-७४ सालातच राजर्षी शाहू व
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जन्मदिन येतात. फुले १८९०
साली गेले. १४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांचा जन्म झाला. फुले-शाहू-आंबेडकर
ही विचारधारा सध्या प्रचलित आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३
रोजी निर्घृण हत्या झाली. त्यांच्या स्मृतिदिनी निघालेल्या मोर्चात
पुढील घोषणा दुमदुमली- ‘फुले-शाहू-आंबेडकर.. आम्ही सारे
दाभोलकर!’ ही घोषणा विलक्षण बोलकी होती. सत्यशोधक चळवळ
संपली असे म्हणणाऱ्यांना मिळालेले हे चोख उत्तर होते.
परिवर्तनवाद्यांच्या महाराष्ट्रातील बहुसंख्य राजकीय-सामाजिक
स्वरूपाच्या सभांतून शिवाजीमहाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे,
बिरसा मुंडा, इ.चा उल्लेख आवर्जून होतो. अलीकडे मला एक
अनुभव येतो. ‘सत्य सर्वाचे आदिघर’
ही जोतिरावांनी दिलेली प्रार्थना म्हणण्याचा आग्रह होतो. पुणे
विद्यापीठाचा नुकताच नामविस्तार झाला.
‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नाव त्यास
मिळाले. समारंभाला मी उपस्थित होतो. श्रोत्यांतून
मला चिठ्ठी आली. त्यात ही प्रार्थना म्हणण्याची सूचना होती.
सांगावयाचा मुद्दा एवढाच, की सत्यशोधक चळवळ
संपली असा समज करून घेणाऱ्यांचा संभ्रम दूर व्हावा.
परिवर्तनवाद्यांना फुले-शाहू-आंबेडकर हा वारसा अभिमानाने
सांगावासा वाटतो. राजकीय संधिसाधू मंडळींची मात्र कोंडी होते.
त्यांना ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचा वास येऊ लागतो. दुसरीकडे
मुस्लीम सत्यशोधक मंडळाला बहिष्कारीत स्वरूपात काम करावे
लागते. नुकत्याच झालेल्या बकरी ईदच्या दिवशी ईदगाह
मैदानाच्या बाहेर आम्ही राष्ट्रीय एकात्मता समिती व मुस्लीम
सत्यशोधक मंडळाच्यावतीने काश्मीर पूरग्रस्त साहाय्य
निधी गोळा केला. आम्ही फुटपाथवर उभे होतो. पाठीमागे
पाटय़ा लावल्या होत्या. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सरचिटणीस
प्रा. शमसुद्दीन तांबोळी म्हणाले- ‘आज आमच्या मंडळाच्या फलक
लावण्याला मुस्लिमांनी विरोध केला नाही, हेही नसे थोडके.’
माझ्या मते, सत्यशोधक चळवळीची आज कधी नव्हे ती तीव्र गरज
आहे. नगर जिल्ह्यातील सोनारी-खर्डा-जवखेडा दलित
हत्याकांडांनंतर झालेल्या प्रत्येक सभेत याची वाच्यता झाली.
दलित व अल्पसंख्याकांवरील हल्ले वाढताहेत. त्यांचे स्वरूप निर्घृण
आहे. आपण लढाई हरतोय असे वाटत असतानाच सर्वोच्च
न्यायालयाचे काही निवाडे दिलासा देतात. पंढरपूरच्या विठ्ठल
मंदिरात बहुजन, दलित, स्त्री-पुजाऱ्यांची नियुक्ती झाली.
संपत्तीच्या वारशात महिलांना समान वाटा मिळाला. संसद व
विधानसभेतील महिला आरक्षणाची वाट मोकळी झाली.
सावित्रीबाईंचे नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा उचित निर्णय
झाला. फुल्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात सावित्रीबाईंचे
बरोबरीने स्थान होते. इतकेच नव्हे, तर फुल्यांच्या पश्चात
सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीला समर्थ नेतृत्व दिले. मात्र,
या पहिल्या शिक्षिकेच्या-
सावित्रीबाईंच्या लेकींना समतेच्या पातळीवर येण्यासाठी आजही
झगडावे लागत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा-विधानसभेतील
त्यांची उमेदवारी व निवडून आलेल्यांची क्षीण आकडेवारी हेच
सांगते.
फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्म सांगितला. तो कागदावरच
राहिला असला तरी स्त्री-शूद्रातिशूद्र समूहांना चेतावणी मिळाली.
यात सर्व शोषित घटक सामावतात. नुकताच वेदांतील
पुरुषसूक्ताच्या सार्वजनिक पठणाबद्दल वाद झाला. ‘ब्राह्मणोऽस्य
मुखमासीद बाहु: राजन्य: कृत:’ हे सूक्त प्रत्येक पूजेत म्हटले जाते.
भटजी ते आवर्जून म्हणतात. ब्राह्मण हा मुख आहे, क्षत्रिय
बाहूपासून, वैश्य मांडय़ांपासून, शूद्र पायापासून निर्माण झाले,
अशी ही मांडणी आहे. वेद-मनुस्मृतीचा आग्रह कालविसंगत
असूनही धरला जातो, हे वास्तव आहे.
सध्या सुरू असलेली हत्याकांडे व हा सनातनी आग्रह याबाबत
गांभीर्याने विचार झाला पाहिजे. चिकित्सा झालीच पाहिजे.
नव्या लोकसभेत व महाराष्ट्राच्या विधानसभेत
सभासदांचा शपथविधी झाला, त्यात संविधानाची शपथ
घेणाऱ्यांची संख्या नगण्य होती. ईश्वराचे नाव घेतले गेले. वर्ण-
जाती-स्त्री-पुरुष भेद,अस्पृश्यता यांचा वापर राजकारणात
प्रच्छन्न होताना दिसतो. लोकसभा-विधानसभेत ३३ टक्के
आरक्षण मागणाऱ्या महिला अवघ्या वीसच असाव्यात?
भारताचे, महाराष्ट्राचे वास्तव रूप स्पष्टपणे मांडले गेले पाहिजे.
केवळ तेवढय़ावर न थांबता पुढील दिशा-
धोरणांची आखणी झाली पाहिजे. धर्म-
जातिव्यवस्थेची चिकित्सा झाल्याशिवाय
धर्मनिरपेक्षता कशी निर्माण होणार? भारतीय संविधानातील
प्रत्येक आधुनिक मूल्याची आग्रहपूर्वक प्रस्थापना झाली पाहिजे.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता,
विज्ञाननिष्ठा या मूल्यांची पेरणी अद्याप होऊ शकलेली नाही.
शिक्षणाचा मूळ उद्देश ‘सत्यशोधन’ असतो. त्यादृष्टीने प्रत्येक
भारतीयाने ‘सत्यशोधक’ बनण्याची आवश्यकता आहे.
आमच्या शिक्षणक्रमात हा विषय वज्र्य
मानला गेल्यासारखा आहे. ‘रक्ताला जात-धर्म-लिंग असा भेद
नसतो, फक्त गट असतात’ हे वैज्ञानिक सत्य सांगितले जात नाही.
जातीचा अहंकार नाहीसा करावयाचा आहे, तर मग हे का सांगायचे
नाही? आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना जात पंचायत
देहान्ताची शिक्षा फर्मावते. दलित तरुण-तरुणींच्या हत्या होतात.
भारतीय संविधानाने नवी मूल्ये स्वीकारली आहेत. डॉ.
आंबेडकरांनी घटनेच्या रूपाने नवी स्मृती दिली. तिचा अंमल
होण्याऐवजी मनुस्मृतीचा उदा-उदो करण्यात धन्यता मानली जाते.
राजस्थानातील जयपूर येथे उच्च न्यायालयात
मनूचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न झाला.
आजही तो पुतळा झाकल्या अवस्थेत आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील काही काळ
राजस्थानचे राज्यपाल होते. त्या काळात जयपूर उच्च
न्यायालयाच्या बाहेर एका चौकात
डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारला गेला. त्याचा राग धरून
सनातन्यांनी मनूला न्यायालयातच खडे केले. आम्ही याविरुद्ध सतत
तीन वर्षे आंदोलन केले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने
या प्रकाराला मज्जाव केला म्हणून मनू झाकला गेला आहे, एवढेच!
जयपूर उच्च न्यायालयातील
पुतळा हलवावा यासाठी महाराष्ट्रातील
आम्ही सत्यशोधकांनी महाडच्या चवदार तळ्यापासून जयपूपर्यंत
पायी मोर्चा काढला. २० मार्च ते १४ एप्रिल अशी ५६ दिवस
वाटचाल झाली. वाटेत अनेक अनुभव आले. फुले-शाहू-आंबेडकर
राज्याबाहेर गेलेच नाहीत. बहुजन राजकीय नेत्यांना त्याची गरज
भासली नाही. त्यांचे वैचारिक-मानसिक करंटेपण
आजच्या घटकेलाही अनुभवाला येते.
भारतातील विषमता पराकोटीची आहे. ती आर्थिक-सामाजिक-
सांस्कृतिक स्वरूपात प्रत्यही अनुभवाला येते. ही विषमता व
सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराची लक्तरे दुनियेच्या वेशीवर
टांगली गेली आहेत. नव्या पंतप्रधानांची घोडदौड दुनियाभर सुरू
आहे. त्यांचा आविर्भाव जग जिंकल्याचा आहे. पण त्यांना यश
मिळेल? मला शंका आहे. डोक्यात सनातनी वृत्ती ठेवून प्रगती,
विकास कसा होणार? भारतीय अर्थव्यवस्था नंबर दोनवरच
अडकली आहे. नॉर्वे, स्वीडन,
डेन्मार्कसारखी छोटी राष्ट्रेही भ्रष्टाचारमुक्त आहेत.
त्यांच्या घटनेत समाजवाद आहे. भारतात धर्मनिरपेक्षता व
समाजवाद या मूल्यांबद्दल खळखळ आहे. समाजवादाला समृद्धीचे,
विकासाचे, भरभराटीचे वावडे नाही, हे पंतप्रधानांना कोणी आणि कसे
सांगायचे? ते स्वामी विवेकानंदांना आठवतात; परंतु
विवेकानंदांना जाणवलेल्या भारतीय मानसिकतेकडे मात्र दुर्लक्ष
करतात. विवेकानंदांच्या पुतळ्याची, त्याच्या आकार-
उंचीची चर्चा होते; विचारांचा मात्र विसर पडतो.
महात्मा फुल्यांनी त्या काळात पुण्यात आर्य समाज संस्थापक
स्वामी दयानंद सरस्वतींच्या मिरवणुकीला सक्रिय साहाय्य केले.
फुल्यांनी ‘गुलामगिरी’ हे पुस्तक अमेरिकेतील
काळ्या मंडळींना साहाय्य करणाऱ्या गोऱ्या मंडळींना अर्पण केले.
फुल्यांची झेप केवढी होती! फुले सत्याला सार्वभौमत्वाची अट
लावतात. ‘सत्य’, ‘सार्वभौम सत्य’ असे शब्दप्रयोग ते वापरतात.
सत्यशोधक म्हणवून घेणाऱ्यासाठी अटी घालतात. डॉ.
आंबेडकरांनी तीन गुरू मानले. बुद्ध, कबीर आणि फुले!
१२५ वर्षांनंतरही आम्ही फक्त फुल्यांचे नामस्मरण करणार
की सत्यशोधकही बनणार, हा यक्षप्रश्न आहे. भारतातील
यच्चयावत स्त्री तसेच शूद्रातिशूद्रांनी सत्यशोधक चळवळ
संघटितरीत्या जोपासली पाहिजे. स्त्री-शूद्रातिशूद्रांत सर्व
शोषितांचा समावेश होतो. आदिवासी, दलित, अल्पसंख्य, सर्व
असंघटित कष्टकरी यात सामावतात.
महात्मा फुल्यांनी ‘शेतकऱ्याचा आसूड’ हाती दिलाय.
आमच्या डाव्या विचारवंतांनी फुले-शाहू-आंबेडकर
या विचारधारेची पुरेशी ओळख करून घेतलेली नाही.
छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव घेतले की काही मंडळी लांब
राहण्याचा प्रयत्न करतात.
त्यांनी फुल्यांनी लिहिलेला पोवाडा वाचावा.
‘कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा
छत्रपती शिवाजीचा..’
शिवाजीराजांनी आपल्या मुलींचे विवाह कुंडल्या पाहून केले नाहीत.
शाहूराजांनी तर इंदूरच्या होळकरांबरोबर विवाहसंबंध घडवले. असे
खूप सांगता येण्यासारखे आहे. नवे घडवण्यासारखे आहे.
‘मी नव्या मनूचा नव्या दमाचा शूर शिपाई आहे.. कोण
मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे.
मी नव्या दमाचा सत्याग्रही सत्यशोधक समाजवादी आहे..’
ही जाणीव याकरता प्रत्येकात
रुजायला हवी.
"राष्ट्रपिता जोतीराव फुले" यांचा स्मृतीदिन आहे. "समाजपरिवर्तनासाठी आपले आयुष्य झोकणारे, शिक्षणमहर्षी थोर भारतीय समाजसुधाकर, "महात्मा ज्योतिबा फुले" यांच्या पुण्यतिथ...
आयुष्य भर कष्ट तुझ्या वाट्याला, तुझ्या मुळे फुलपण आम्हा काट्याला, कसे फेडू पांग,कसे होऊ ऊतराई, कोटी कोटी लेकराची आई....... माता रमाई यांच्या जयंती निमित्त ञिवार वंदन .....
"फुले दांपत्य सन्मान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा" (१ जानेवारी) १ जानेवारी १८४८ रोजी फुले दांपत्यांनी पुणे येथे भारता मधली पहिली मुलींची शाळा सुरू केली व त्यानंतर बहुजनां ...
Comments
Post a Comment